इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमधून निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहे. यावेळी त्यांनी मला माहिती नसताना नाशिकसाठी दिल्लीतूनच माझ्या नावाचा प्रस्ताव आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. आपल्याला तिकीट मिळालं तर आपण नाशिकमधून लढायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, मी तिकीटासाठी आग्रही नव्हतो हे मी मागेही सांगितलंय. दिल्लीत जी चर्चा झाली, त्यात महाराष्ट्राबाबत माझ्या नावाची चर्चा झाली. या चर्चेत माझं नाव पुढे आले. माझे नाव लोकसभेसाठी पुढे येईल, याची मला कल्पनाही नव्हती. होळीसाठी निघालो होतो तेव्हा अर्ध्या वाट्यातून मुंबईला गेलो. वरिष्ठ पातळीवरून ठरलंय असं मला सांगितलं गेलं. मीही त्यांना मला एक दिवस द्या असं म्हटलं, असं छगन भुजबळ म्हणाले.
त्यानंतर मी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. माझ्या नावाची चर्चा सुरू आहे हे खरं आहे का? असं त्यांना विचारलं. त्यावर, तुम्हाला उभं राहवं लागले. आम्ही चाचपणी केली, असं अजितदादा म्हणाले. उभं राहायचं असेल तर आधी तयारी करतात. पण ही गोष्ट बाहेर गेली आणि नाशिकमध्ये चर्चा रंगली, असं भुजबळांनी सांगितलं.