इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर – नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ निघालेल्या लोकसंवाद यात्रेला आज (शनिवार) मध्य नागपुरातून जल्लोषात प्रारंभ झाला. यावेळी नागरिकांनी स्वयंस्फूर्त पुष्पवृष्टी करून गडकरींवर अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला.
राजवाडा पॅलेस जवळील भारत माता चौकातून लोकसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. सुरुवातीला श्री. गडकरी यांनी भारत मातेला अभिवादन केले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर संदीप जोशी, माजी महापौर अर्चना डेहनकर, संदीप गवई, श्री. गिरीश देशमुख, श्री. सुधीर राऊत आदींची उपस्थिती होती. श्री. गडकरी यांच्या प्रचारासाठी सजविण्यात आलेल्या खास रथात लोकसंवाद यात्रा सुरू झाली. श्री. गडकरी यांनी मराठमोळ्या संस्कृतीचे प्रतीक असलेला फेटा परिधान केला होता. सर्व मार्ग तसेच वस्त्यांमध्ये ‘नितीन गडकरी आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘कहो दिल से, नितीनजी फिर से’, ‘व्वा रे कमल, आ गया कमल’ अशा घोषणांनी यात्रेचे स्वागत झाले. कुठे ढोल ताशाच्या गजरात, तर कुठे औक्षवण करून लोक आपल्या नितीनजींचे स्वागत करीत होते. अनेक वस्त्यांमधील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद दिले आणि प्रचंड मताधिक्याने विजयासाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील प्रत्येक घटक अतिशय उत्साहाने लोकसंवाद यात्रेमध्ये सहभागी झाला होता.
काही वस्त्यांमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी पुष्पवर्षाव करून ना. श्री. गडकरी यांचे स्वागत केले. प्रत्येक वॉर्डात महिला वर्ग, ज्येष्ठ महिला औक्षण करण्यासाठी पुढे आल्या. काहींनी मिठाई भरवून तर काहींनी गाठी देऊन शुभेच्छा दिल्या. एका तरुणाने तलवारबाजीचे कौशल्य दाखवित ना. श्री. गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेत उत्साह भरला. भारत माता चौकातून निघालेल्या यात्रेचा गणेशपेठ येथील मॉडेल मिल चौकात समारोप झाला.
अशी निघाली यात्रा
सकाळी नऊच्या सुमारात राजवाडा पॅलेस जवळील भारत माता चौकातून यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर छत्रीवाले गणपती, मारवाडी चाळ, आरीफ हॉटेल, बजेरिया चौक, शीतला माता चौक, हज हाऊस, मेडिसिन मार्केट, गणेश चौक, गांधी पुतळा, फायर ब्रिगेड, स्वीपर कॉलनी, लोहारपुरा मशीद, राम भंडार महाल, बडकस चौक (पं. बच्छराज व्यास चौक), लाकडी पूल, आझाद चौक, ढिवर पुरा, ज्ञानेश्वर मंदिर, गंगाबाई घाट, शिवाजीनगर गेट, अग्निमाता मंदिर रोड, नवाबपुरा पोलीच चौकी, अयाचित मंदिर चौक, झेंडा चौक, गुप्ते चौक, नाईक रोड, भोसले वाडा, दसरा रोड, राजकमल चौक, सिरसपेठ-वकीलपेठ चौक, अशोक चौक, कर्नलबाग, मॉडेल मील चौक या मार्गाने डॉ. कोल्हे व्यायामशाळा येथे लोकसंवाद यात्रेचा समारोप झाला.