इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी मुंबईमधील भाजप कार्यालयात आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे नेते उपस्थितीत होते.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मराठवाड्यात आता पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चाकूरकर यांचे मानसपुत्र अशी ओळख असणारे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर हा मोठा प्रवेश सोहळा झाला. शिवाजी चाकूरकर यांना केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती, राज्यपाल अशी पदे देऊनही त्यांच्या सून डॉ. अर्चना यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
कालच डॉ. चाकूरकर यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. लातूर लोकसभा मतदारसंघ आणि जिल्हा या दोन्हीमध्ये चाकूरकर कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. चाकूरकर परिवार भारतीय जनता पक्षासोबत आल्यानंतर मराठवाड्यामध्ये केवळ विलासराव देशमुख यांचे पुत्र काँग्रेस सोबत राहणार आहे.