इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अरबी समुद्र आणि हिंद महासागरामध्ये भारतीय नौदलाने धाडसी कारवायांचा धडाका लावला आहे. आताही एक मोठी आणि धाडसी कारवाई करण्यात नौदलाला यश आले आहे. चाचेगिरी करणाऱ्या इराणी जहाजावरील ऑपरेशन नौदलाने फत्ते केले आहे. गेल्या गुरुवारी (२८ मार्च) संध्याकाळी उशिरा ही मोहिम यशस्वी झाली. इराणी मासेमारी जहाज ‘अल कंबर ७८६’ वर संभाव्य चाचेगिरीची माहिती नौदलाला प्राप्त झाली. त्यानंतर भारतीय नौदलाची दोन जहाजे सागरी सुरक्षा ऑपरेशन्ससाठी अरबी समुद्रात तैनात करण्यात आली. आणि मिशन अपहृत मासेमारी नौकेला रोखण्यासाठी वळवण्यात आली.
घटनेच्या वेळी मासेमारी जहाज हे सोकोत्राच्या दक्षिण-पश्चिमेला अंदाजे ९० नॉटिकल माईल होते. आणि त्यावर नऊ सशस्त्र समुद्री चाचे चढले होते. अपहृत जहाजाला शुक्रवारी (२९ मार्च) रोखण्यात आले आहे. भारतीय नौदलाकडून सध्या अपहृत जहाज आणि त्याच्या क्रूच्या बचावासाठी ऑपरेशन सुरू आहे.
भारतीय नौदल या प्रदेशात सागरी सुरक्षा आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आयएनएस सुमेधा या भारतीय नौदल जहाजाने शुक्रवारी पहाटे अल-कंबर या जहाजाला रोखले. त्यानंतर मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट आयएनएस त्रिशूल द्वारे सामील झाले.
नौदलाने आखलेल्या रणनितीनुसार, १२ तासांहून अधिक वेळ हे ऑपरेशन चालले. तीव्र सक्तीच्या सामरिक उपायांनंतर अपहरण केलेल्या जहाजाला रोखण्यात आले. त्यानंतर जहाजावरील समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्यात आले. या जहाजावरील २३ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश असलेल्या क्रूची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. भारतीय नौदलाकडून आता या जहाजाची विशेष तपासणी सुरू आहे. या जहाजाला सुरक्षित ठिकाणी नेले जाणार आहे. भारतीय नौदलाच्या या कारवाईची सध्या आशियाई देशांसह जगभरात चर्चा होत आहे.