इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महाविकास आघाडीत तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार का? यावर आता जोरदार राजकीय चर्चा सुरु आहे. सांगली, भिंवडी, दक्षिण मध्य मुंबई या तीन जागांचा समावेश आहे. या जागेवर अनेक बैठका झाल्या पण, त्यातून तोडगा निघाला नाही. त्यामुळे काँग्रेस मोठा निर्णय घेण्याची तयारीत असल्याची चर्चा काल दिवसभर होती. ही चर्चा सुरु असतांना शिवसेना ठाकरे गटाने त्याला जोरदार आक्षेप घेतला.
शुक्रवारी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या ऑनलाइन बैठकीत राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. याशिवाय महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत न सुटलेल्या भागांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी वादाच्या या जागांवर सौहार्दपणे लढू, अशी भूमिका या बैठकीत काही नेत्यांनी घेतली. विशेष म्हणजे या बैठकीचा अहवाल आणि मैत्रीपूर्ण लढतीची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसची भूमिका निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेवर काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळून लावत संजय राऊत म्हणाले, की तिथे मैत्रीपूर्ण लढत झाल्यास विरोधी पक्षाला संधी मिळेल. काँग्रेस हा परिपक्व पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेऊ नये.