इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : जीएसटीचा टक्के वाढविल्यापासून गेमिंग कंपन्या अडचणीत आल्या आहेत. मुख्य म्हणजे या कंपन्यांना गेल्या दहा वर्षातील जीएसटीसंर्भात नोटीस पाठविण्याचा प्रकार सुरू आहे. याविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याची तयारी कंपन्यांनी दर्शविली आहे. अशात अजून एका कंपनीला तब्बल २३,२०० कोटींची नोटीस आली आहे. त्यामुळे कंपनीसह गुंतवणुकदारांनादेखील टेन्शन आले आहे.
गेमिंग कंपनी डेल्टा कॉर्पचे शेअर्स आज ३ वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. जुलैच्या मध्यापासून कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. कंपनी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. प्रथम, सरकारने ऑनलाइन गेमिंग कंपन्या, कॅसिनो इत्यादींवरील जीएसटी वाढवून २८ टक्के केला आहे. आता कंपनीला २३,२०० कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे. या दोन्ही बातम्यांनी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी, डेल्टा कॉर्पचे शेअर्स बीएसईमध्ये १३२.४० रुपयांच्या पातळीवर उघडले. मात्र, १२ टक्क्यांहून अधिक घसरणीनंतर कंपनीचे शेअर्स १२४.६० रुपयांच्या पातळीवर आले. ही कंपनीची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. जेव्हा डेल्टा कॉर्पला पहिल्यांदा जीएसटीची नोटीस मिळाली तेव्हा कंपनीचे शेअर्स १८० रुपयांच्या जवळपास ट्रेंड करत होते. तेव्हापासून कंपनीचे शेअर्स ३० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. सध्या कंपनीचे मूल्यांकन ४ हजार कोटी रुपये आहे आणि कंपनीला मूल्यांकनाच्या जवळपास सहापट टॅक्स भरायचा आहे.
चार टॅक्स नोटीसची दिली माहिती
डेल्टा कॉर्पने २२ सप्टेंबरला ४ निरनिराळ्या टॅक्स नोटीसची माहिती दिली होती. डेल्टा कॉर्पला जुलै २०१७ चे मार्च २०२२ साठी ११,१३४ कोटी रुपये, कॅसिनो डेल्थ डेझाँगला ६२८.२ कोटी रुपयांची नोटीस, हायस्ट्रीट क्रुझेसला ३२८९.९४ कोटी रुपयांची नोटीस आणि डेल्टा प्लेझर क्रुझला १७६५.२१ कोटी रुपयांची नोटीस मिळाली होती. यानंतर १४ ऑक्टोबर रोजी कंपनीने एकदा २ सब्सिडायरी कंपन्यांना नोटीस मिळाल्याची माहिती दिली होती.