नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमआयडीसी कामगारांना चाकुचा धाक दाखवुन लुटणा-या टोळीस एमआयडीसी चुंचाळे पोलीसांनी बेड्या ठोकल्या. या चोरांकडून ३० मोबाईलसह एकुण ३ लाख ५४ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून ४ इसमांना अटक केली आहे.
एमआयडीसी मध्ये काम करून रात्रीचे वेळेस घरी जात असलेल्या कामगारांना अंधाराचा फायदा घेवून रस्त्यात अडवुन त्यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील मोबाईल चोरी झाल्याच्या घटना एमआयडीसी, चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत घडल्या होत्या. सदर चोरांचा शोध घेत असताना त्यांचे नाव व ठावठिकाण्याबाबत गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस शिपाई १अनिल कु-हाडे यांना खब-यामार्फत मिळाली.
सदर गोपनीय माहितीची शहानिशा करून नमुद चोरांना पकडुन पुढील कारवाई करणेकरिता प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदिप पवार, पोउनि अतुल पाटील, पोउनि संदिप शेवाळे व पथकास दिल्या. गोपनीय माहितीनुसार पोउनि संदिप पवार व पथकाने साफळा लावुन खालील नमुद आरोपीस ताब्यात घेतले. त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता जबरी चोरी केलेल्या मोबाईल पैकी एक मोबाईल फोन मिळुन आला. सदर मोबाईल फोन दोन पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतला. नमुद आरोपीकडे त्याचे इतर साथिदाराबाबत व जबरी चोरी केलेल्या इतर मोबाईलबाबत कसुन तपास करून विचारणा केली असता त्याचे खालील नमुद साथिदारांचा गुन्हयात सहभाग असल्याचे निश्चित झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. अटके दरम्यान खालील नमुद आरोपींकडुन ३० मोबाईल फोन, एक धारदार चाकु, दोन मोटारसायकल असा एकुण ३ लाख ५४ हजार रुपयाचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पकडलेल्या आरोपींमध्ये मंगेश उर्फ मंग्या अंकुश पवार (२४), निलेश उर्फ निल्या देवीदास खरे (२२), कुणाल रविंद्र पगार (२४), कुणाल यादव जाधव (२४) यांचा समावेश आहे.