इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार आहे. त्यात बारामती, शिरूर, सातारा, अहमदनगर, रावेर, दिंडोरी, बीड, वर्धा, भिवंडी आणि माढा या मतदार संघातील उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित आहे. तर नगरमधून नीलेश लंके, दिंडोरीमधून भास्कर भगरे आणि भिवंडीतून बाल्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे हे संभाव्य उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. सातारा, माढा, बीड, वर्धा, रावेर या मतदार संघाचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाही.
महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाला २२, काँग्रेस १६ आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा असे जागावाटप झाले आहेत. यातील महाविकास आघाडीचे ४४ जागेवर एकमत झाले आहे. पण, चार जागांवर अजून निर्णय होणे बाकी आहे. यातील ठाकरे गटाने १७ जागांची यादी जाहीर केली आहे. तर कॉंग्रेसनेही १० जागांची उमेदवारी यादी जाहीर केली. पण, शरद पवार गटाची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे ती आज जाहीर होणार आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.