नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढण्याची तयारी असतांना सांगली,भिवंडी,मुंबई येथील जागा मैत्रीपूर्ण पद्धतीने लढत असल्यास नाशिक लोकसभेची जागा देखील लढवावी अशी मागणी कॉंग्रेस उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.
नाशिक हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे पण गेली अनेक वर्षापासून हि जागा कॉंग्रेस पक्ष लढला नाही पण खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला नाशिक शहरात व त्रंबकेश्वर येथे अभूतपूर्व प्रतिसाद प्राप्त झाला असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे.भाजपच्या जातीयवादी व हुकुमशाही प्रवृत्तीला जनता वैतागली आहे.
कॉंग्रेसचे कै.गो.ह देशपांडे, कै.यशवंतराव चव्हाण, कै.मुरलीधर माने, प्रताप वाघ, कै.वसंतराव पवार, कै.माधवराव पाटील असे अनेक खासदार या मतदारसंघातून निवडणून गेले आहे. त्यावेळेस हा मतदारसंघ नाशिक, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर,अकोला एवढा मोठा मतदारसंघ असतांना सुद्धा या मतदारसंघात कॉंग्रेसचा वरचष्मा राहिला परंतु गेल्या चार टर्म पासून हा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन नाशिक शहरांत चार आमदार व सिन्नर,इगतपुरी त्रंबक मिळून सहा विधानसभा मिळून नाशिक लोकसभा मतदारसंघ तयार झाला.
नाशिक लोकसभा मतदार संघात कडवी झुंज देण्याची क्षमता असलेले उमेद्वार कॉंग्रेस पक्षांत आहे. परंतु आतापर्यंत वरिष्ठ पातळीवर दखल घेतली गेली नाही तरी सांगली,भिवंडी,मुंबई येथील जागा मैत्रीपूर्ण पद्धतीने लढत असल्यास नाशिक लोकसभेची जागा देखील मैत्रीपूर्ण पद्धतीने लढवावी.त्यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिक लोकसभेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेस उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.