इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निमित्ताने ‘इंडिया’ आघाडीचे नेते निवडणुकीपूर्वी एका मंचावर दिसणार आहेत. ३१ मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीचा संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे.
आम आदमी पक्षाला निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांकडून रॅलीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. रॅलीमध्ये जास्तीत जास्त २० हजार लोकांनाच जमण्याची अट घालण्यात आली आहे. ‘हुकूमशाही हटाव, लोकशाही वाचवा’ अशी घोषणा रॅलीचे घोषवाक्य आहे. त्यात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी पक्षांचे डझनभर मोठे नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीत शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव हेही सहभागी होणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या वतीने डेरेक ओब्रायन रॅलीत सहभागी होणार आहेत.
केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासोबतच विरोधक ऐतिहासिक रामलीला मैदानातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. ‘आप’चे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले, की ‘इंडिया’ आघाडीचे सर्व मोठे नेते महारॅलीत जमतील.