नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात गुरूवारी वेगवेगळय़ा भागात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यात एका वयोवृध्दासह ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड व आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना शिलापूर टोलनाका भागात उघडकीस आली. याबाबत माडसांगवीचे पोलीस पाटील कृष्णा बाबजी गरड यांनी खबर दिली. शिलापूर येथील टोलनाका भागात असलेल्या उड्डाणपूलाजवळ गुरूवारी ४० ते ४५ वयोगटातील इसमाने निंबाच्या झाडाला साडी बांधून गळफास लावून घेतलेले आढळून आले. सदर इसमाची अद्याप ओळख पटली नसून याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार राजोळे करीत आहेत.
दुस-या घटनेत सिडकोतील राहूल श्रीधर कर्डक (६७ रा.साईबाबानगर) यांनी गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा ईश्वर कर्डक यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.