नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर परिसरात फळांच्या गोडावूनसह अॅक्वा युनिटसाठी राजरोज वीज चोरी केली जात असल्याचे महावितरणने टाकलेल्या छाप्यात पुढे आहे. दोन घटनांमध्ये तब्बल ७० हजार २८८ युनिटची वीज चोरी करण्यात आली असून यामुळे वीज कंपनीचे सुमारे साडे नऊ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे सातपूर पोलीसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
ठाणे येथील भरारी पथकाने दोन दिवसांपूर्वी पाथर्डी शिवारात छापेमारी करीत वीज चोरीचे प्रकार उघडकीस आणले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महावितरणचे मुख्यालय असलेल्या नाशिकरोड कार्यालयाने छापे मारी सुरू केली आहे. या पथकांनी सातपूर भागात छापे टाकून दोन व्यावसायीक वीज चोरीचे उघडकीस आणले आहेत. पिंपळगाव बहुला येथील साई तीर्थ अॅक्वा युनिट मध्ये वीज चोरी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता येथे तब्बल १२ हजार ८ युनिटची वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याबाबत अशिष चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ भगवान भावले (रा.पिंपळगाव बहुला) यांच्या विरोधात पोलीसदप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबधीतांनी २ लाख ७० हजार २३० रूपयांचे वीज कंपनीचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दुसरा प्रकार औद्योगीक वसाहतीतील सर्व्हे नं. ४१६ – १ येथील फळ साठवणुक गोडावून मध्ये उघडकीस आला. या ठिकाणी ५८ हजार २८० युनिटची वीज चोरी झाली. याबाबत कुणाल फ्रुट एजन्सीच्या मालक अरूची विनय चव्हाण (रा.सातपूर) यांच्याविरोधात पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून चव्हाण यांनी वीज कंपनीचे सुमारे ६ लाख ७८ हजार ९३० रूपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत विजकंपनीचे विद्युतकुमार पवार यांनी फिर्याद दिली आहे.