नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खंडणी विरोधी पथकाने केलेल्या वाहन तपासणीत शहरात कारमधून बेकायदा दारूची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या कारवाईत सव्वा दोनलाख रूपये किमतीची विदेशी दारू व बिअरचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कारचालकाविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारूती सचिन गव्हाणे (रा.सुमनराज रो हाऊस,देवी मंदिररोड शिंदेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. याबाबत खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक भुषण सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. भारत सरकार मुद्रणालय परिसरात एका कारमधून दारूचा साठा वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
त्यानुसार बुधवारी (दि.२७) पोलीसांनी धाव घेत संशयिताची डिझायर कार प्रभाकर भिमराव रामराजे मार्गावरील शांती अपार्टमेंट समोर अडवून तपासणी केली असता कारमध्ये विदेशी दारू आणि बिअरची बॉक्स असा सुमारे २ लाख २५ हजार ९८० रूपये किमतीचा बेकायदा साठा आढळून आला. संशयिताने हा साठा कोठून व कोणासाठी आणला याबाबत शोध सुरू असून अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.