नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मका पुरवठा करण्याचे आमिष दाखवून १४ लाखास व्यापा-याची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन मका खरेदी विक्री करण्यातून हा गंडा घातलण्यात आला आहे.
प्रशांत पाटील उर्फ प्रसाद शंकर गागुर्डे व योगेश अहिरे अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत. याप्रकरणी शहरातील एका व्यापा-याने फिर्याद दिली आहे. सदर व्यापा-याचा मका सिडस निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. भामट्यांनी सोशल मिडीयावर ऑनलाईन ५०० टन मका विक्री बाबत जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यामुळे व्यापा-याने संशयितांशी संपर्क साधला असता ही फसवणुक झाली. गेल्या २९ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान संशयितांनी विश्वास संपादन करीत व्यापा-यास १४ लाख ९ हजार १०० रूपयांची रक्कम विविध बँक खात्यात भरण्यास भाग पाडले.
मात्र बरेच दिवस उलटूनही ५०० टन मका संशयितांनी पोहच न केल्याने व्यापा-याने खात्री केली असता सदर जाहिरात फेक असल्याचे समोर आले. बनावट आयडीच्या माध्यमातून जाहिरात प्रशिध्द करण्यात आली होती. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच व्यापा-याने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.