इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर काही तासात त्यावर ठाकरे गटाने जोरदार निशाणा साधत सोशल मीडियावर दोन पोस्ट करत टीका केली आहे. एका पोस्टमध्ये तर ज्या गोविंदावर भाजपने ‘दाऊदची मदत’ घेतल्याचे आरोप केले, त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना? असा प्रश्न केला आहे.
तर दुस-या पोस्टमध्ये भाजपचे निष्ठावंत केवळ सतरंज्या उचलायला आहेत? असा प्रश्नही केला आहे. या दोन्ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याविरोधात गोविंदाला उमेदवारी देण्यासाठी शिंदे गटाने हा प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आताच त्याला लक्ष केले आहे.
गोविंदाने या अगोदर काँगेसकडून उमेदवारी करुन भाजपचे राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यानंतर तो खासदार झाला. पण, त्यानंतर त्याने राजकारणापासून लांब राहणेच पसंद केले. पण, पुन्हा १४ वर्षानंतर तो राजकारणात आला आहे. त्यामुळे त्याचा प्रवेशही चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर चालणारे नट तरी घ्यायला हवे असे सांगत टीका केली. तर शिवसेनेने थेट दाऊदशी संबध असल्याच्या पोस्टच टाकल्या आहे.