मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज, मुंबईतील पश्चिम रेल्वे विभागातील इलेक्ट्रिकल अभियंता (ऊर्जा) के. एल. मीणा याला लाचखोरीच्या खटल्यात दोषी ठरवत, तीन वर्षांची सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
पश्चिम रेल्वेच्या डीईई विभागात, इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या के. एल. मीणा यांना एका व्यक्तीला कंत्राट देण्याच्या बदल्यात, ३ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार सीबीआयने १५ एप्रिल २०१५ रोजी दाखल केली होती. सीबीआयने सापळा रचून, २४ एप्रिल २०१५ रोजी लाचखोर अधिकाऱ्याला तक्रारदाराकडून, १ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते.
सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने १३ ऑक्टोबर २०१५ रोजी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर, २९ सप्टेंबर २०१६ रोजी, त्यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले.
खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने, अधिकाऱ्याला दोषी ठरवत शिक्षा जाहीर केली. या खटल्यात सीबीआयने १२ साक्षीदार न्यायालयासमोर हजर केले होते.