नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात तोतया पोलीसांचा सुळसुळाट झाला असून बुधवारी (दि.२७) सिडकोतील संभाजी स्टेडिअम भागात ७६ वर्षीय वृध्देस गाठून भामट्यांनी सोन्याचे दागिणे लांबविले. या घटनेत मदतीच्या बहाण्याने सुमारे ९० हजाराचे अलंकार लांबविण्यात आले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुसूम विश्वनाथ भावसार (रा.अश्विननगर,सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भावसार बुधवारी नेहमी प्रमाणे संभाजी स्टेडिअम येथे फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. फेरफटका मारून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. वाटेत त्यांना दुचाकीस्वार भामट्यांनी गाठले.
पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी त्यांना हातातील बांगड्या व गळयातील सोनसाखळी काढून ठेवण्याचा सल्ला दिला. यावेळी रूमालात दागिणे बांधून देत असल्याचे भासवून सोन्याच्या बांगड्या व सोनसाखळी असा सुमारे ९० हजाराचा ऐवज लांबविला. भावसार यांनी घरी जावून रूमाल खोलला असता ही बाब समोर आली. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.