नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरपालिकेचे बाळासाहेब ठाकरे बिटको रूग्णालय येथे रक्तपेढीसाठी साडेतीन कोटींची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली असून लवकरच या रूग्णालयात अत्याधुनिक रक्तपेढीची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण यांनी दिली.
ऐच्छिक रक्तदान मास – ऑक्टोबर २०२३ निमित्त शासकीय रक्तपेढी, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, मेट्रो रक्तपेढी, शासकीय जिल्हा रुग्णालय, नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने सायकल फेरी, रांगोळी, उखाणे स्पर्धा, बर्थ डे ब्लड डोनर्स क्लब, नाचू कीर्तनाचे रंगी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच उपक्रमांतर्गत १५ ऑक्टोबर रोजी नाशिक शहरातील वैद्यकीय मंडळींसाठी, शालीमार येथील इंडीयन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात रक्त संक्रमण विज्ञान विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. तानाजी चव्हाण बोलत होते.
या कार्यशाळेस डॉ.निलेश वासेकर, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. प्रितेश जुनागडे, डॉ. राजेश कुचेरीया व डॉ. पुरुषोत्तम पुरी हे विषयतज्ञ सहभागी झाले होते. सदर कार्यशाळेस महाराष्ट्र मेडीकल असोसिएशनच्या दोन क्रेडिट पॉइंटस् ची मान्यता देण्यात आली होती. नाशिक शहरातील एकूण १२५ डॉक्टरांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला. इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी अशा कार्यशाळा वेळोवेळी आयोजित करणे आवश्यक असल्याचे सांगितले.रक्तसंक्रमण विज्ञान या विषयातील अत्याधुनिक ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने सर्व डॉक्टर, विषयतज्ञ तसेच तांत्रिक कर्मचारी यांनी विशेष रुची दाखविल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी उपस्थितांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पुरी यांचे ‘मिशन ब्लड: नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ या विषयावर प्रभावी सादरीकरण झाले. लावणी, पोवाडे, अभंग या माध्यमातून मनोरंजन करतानाच त्यांनी “ कथा रक्ताची, व्यथा दानाची “ या विषयावर माहिती उपस्थितांना दिली. तसेच सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी बर्थडे ब्लड डोनर्स क्लब ची स्थापना करून प्रत्येक पात्र रक्तदात्यांनी आपला स्वतःचा वाढदिवस रक्तदान करून साजरा केल्यास रक्त कमी पडणार नाही अथवा वाया देखील जाणार नाही, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विशाल गुंजाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. माधवी गोरे मुठाळ यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. सुचिता गंधे, डॉ. दीपक पाटील, डॉ. करण वर्मा, रक्तपेढी कर्मचारी श्री अनिल मोरे, श्री अभिजीत कापसे, श्री सचिन माने यांनी परिश्रम घेतले.