नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने मारहाण केल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतल्याने शिवली (जालना) पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा भद्रकाली पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी शहरातील दांम्पत्यासह पीडितेच्या पतीविरोधात बलत्कारासह बालविवाह आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंदना मगर, राधाकिसन मगर व पांडूरंग शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अल्पवयीन पीडितेचा विवाह १७ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला. पती पांडूरंग शिंदे (रा. जिंतूर जि. परभणी) याने मुलगी अल्पवयीन असतांनाही तिच्याशी शारिरीक संबध ठेवले. गेल्या पाच महिन्यांपासून संशयिताने पूणे येथील खेड तालूक्यात व जालना जिह्यातील शिवली पोलीस स्टेशन भागात घेवून जात तिचा शारिरीक व मानसिक छळ केला.
चारित्र्याच्या संशयातून रोजच पती मारहाण करीत असल्याने तिने शिवली पोलीस ठाणे गाठल्याने या प्रकारास वाचा फुटली असून हा गुन्हा भद्रकाली पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.