नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डमी व्यक्तीने स्पाय कॅमेरा आणि ब्ल्यू टुथच्या माध्यमातून पेपर दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महानिर्मिती कंपनीच्या कनिष्ठ अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या भरती परिक्षेत हा गैरप्रकार घडला. परिक्षेत गैरप्रकार करून पात्र झालेल्या परिक्षार्थीच्या पडताळणीत ही फसवणुक समोर आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात छत्रपती संभाजीनगर येथील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रणजीत रतनसिंग जारवाल (रा. बोंबल्याची वाडी पो.खोंडेगाव ता.जि.संभाजीनगर), सौरभ हिरालाल जारवाल (रा.संजापूरवाडी पो.पारसोडा ता.वैजापूर) व त्यांचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करणयत आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत योगेश सावकार (रा.इंदिरानगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. महानिर्मिती कंपनीच्या वतीने कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या शुक्रवारी (दि.१५) शहरातील पुणे विद्यार्थी गृहाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअर येथे परिक्षा पार पडली. या परिक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांच्या यादीत हा प्रकार समोर आला आहे. संशयितांनी डमी इसम बसवून परिक्षा दिल्याचे वास्तव समोर आल आहे.
उमेदवारीचा ऑनलाईन अर्ज भरतांना व पात्र झालेल्या उमेदवाराच्या छायाचित्रात तफावत आढळून आल्याने चौकशी अंती डमी व्यक्तींनी परिक्षा दिल्याचे पुढे आले आहे. परिक्षा केंद्रावर स्पाय कॅमेरा व ब्ल्यू टुथ या उपकरणांचा वापर संशयितांनी केला आहे. स्पाय कॅमे-याच्या माध्यमातून प्रश्न बाहेरील व्यक्तींना पाठवून ब्ल्यू टुथ वर सांगण्यात आलेले उत्तरे सोडविण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल परिक्षा घेणा-या आयबीपीएस या संस्थेने दिल्याने पोलीसात धाव घेण्यात आली आहे. एकुणच या रॅकेटचा भांडाफोड होण्याची शक्यता असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.