इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशच्या पिलीभीत लोकसभा मतदार संघातून भाजपने वरुण गांधी यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते पक्षावर नाराज आहे. ते बंडखोरी करतात की काँग्रेसकडून उमेदवारी करतात हे निश्चित नाही. पण, त्यांनी आज त्यांच्या मतदार संघातील लोकांना एक भावनिक पत्र लिहले असून ते मात्र चांगलेच चर्चेत आहे.
या पत्रात वरुण गांधी यांनी म्हटले आहे की, आज हे पत्र लिहित असताना असंख्य आठवणींनी मला भावूक केले आहे. मला आठवतंय तो ३ वर्षाचा लहान मुलगा जो १९८३ मध्ये पहिल्यांदा आईचं बोट धरून पिलीभीतला आला होता. त्याला कसं माहीत होतं की एक दिवस हीच जमीन त्याचं कामाचं ठिकाण होईल आणि इथले लोकच त्याचं कुटुंब बनतील.
पिलीभीतच्या महान लोकांची वर्षानुवर्षे सेवा करण्याची संधी मला मिळाली हे मी स्वतःला भाग्यवान समजतो. पिलीभीतमधून मला मिळालेले आदर्श, साधेपणा आणि दयाळूपणा यांचा माझ्या संगोपनात आणि विकासात, केवळ एक खासदार म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही मोठा वाटा आहे. तुमचा प्रतिनिधी असणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि मी माझ्या क्षमतेनुसार तुमची आवड नेहमी जपली आहे.
माझा खासदारकीचा कार्यकाळ संपत असला तरी पिलीभीतशी माझे नाते शेवटच्या श्वासापर्यंत संपू शकत नाही. खासदार म्हणून नाही तर मुलगा म्हणून आयुष्यभर तुमची सेवा करायला तयार आहे.