इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर – रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यामळे काँग्रेस समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल (२७ मार्च ) संपली. त्यानंतर उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्रावर जात पडताळणी समितीने हा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार आता कोण असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.
दरम्यान रश्मी बर्वेंचे प्रमाणपत्र रद्द झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून श्यामकुमार बर्वे यांचे नाव देण्यात आले होते. त्यामुळे आता श्यामकुमार बर्वे हे रामटेकमधून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेकचे विद्यमान शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापत काँग्रेसमधून आलेले आमदार राजू पारवे यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पारवे विरुद्ध बर्वे असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.