नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचा वीर अभिमन्यू पुरस्कार प्राप्त खो खो खेळाडू दिलीप खांडवी यांची भारतीय रेल्वे संघात निवड झाली आहे. दिल्ली येथे दिनांक २८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ५६ व्या पुरुष/ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत तो गतवर्षीच्या विजेत्या भारतीय रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. सेंट्रल रेल्वे मुंबई यांच्या सेवेत खेळाडू talant कोट्यातून नुकतीच त्याला नोकरी लागली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या खो खो इतिहासातील तो पाहिला खो खो खेळाडू आहे की ज्याची रेल्वे मध्ये खेळाडू म्हणून निवड झाली आहे. दिलीप हा उत्तर महाराष्ट्रातील पाहिला खो खो पटू आहे ज्याने आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर रेल्वे मध्ये नोकरी पटकावली आहे. सुरगाणा तालुक्यातील कृष्ण विहीर या पाड्यावरील खेळाडूने खेळाच्या जोरावर चांगली नोकरी लागू शकते हे सिद्ध केले. दिलीपची वरिष्ठ गटातील ही सलग दूसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे.
सलग दोन राष्ट्रीय स्पर्धा खेळणारा दिलीप हा नाशिकचा पाहिला खेळाडू असून गतवर्षी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत त्याने उपविजेत्या महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते. तो लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी यांचा विद्यार्थी असुन गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली छ्त्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल नाशिक येथे नियमीत सराव करत असतो. दिलीपची भारतीय रेल्वे संघात निवड झाल्या बद्दल नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन आणि संस्कृती नाशिकच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.