इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश आहे. या ४० जणांच्या यादीत शिवसेनेतील लोकसभेतील प्रमुख नेत्यांची नावे नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या दहा मध्ये पाच नावे भाजप नेत्यांची आहेत. तर एकूण यादीत २५ टक्के प्रचारक हे परपक्षाचे आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने कधीच कमी नव्हते आणि त्यांना असल्या उसन्या भाटांची गरज पडली नाही. ते विचार तुम्हाला कळले नाहीत, म्हणूनच या उसन्या प्रचारकांच्या, उसन्या विचारांच्या आणि भंपक योजनांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत.
मोडेन पण वाकणार नाही, हा सुविचार महाराष्ट्राचा स्वभाव दर्शवतो.. यांचा कारभार उलटा आहे.. ‘वाकेन पण मोडणार नाही’!