नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील हिंदूस्थान सिमेंट पाईप कंपनी जवळ पार्क केलेल्या कारमधून चोरट्यांनी लॅपटॉपसह रोकड व महत्वाची कागदपत्र चोरून नेली. या घटनेत चोरट्यांनी सुमारे ५० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्रन रामामुर्ती राजू (रा.रामेश्वरनगर, आनंदवली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रविंद्रन राजू मंगळवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास सातपूर औद्योगीक वसाहतीत कामानिमित्त गेले होते. हिंदूस्थान सिमेंट पाईप कंपनीच्या भिंतीलगत त्यांनी आपली कार पार्क करून ते अल्पावधीसाठी नजीक गेले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी कश्याने तरी कारचा दरवाजा उघडून कारच्या सिटावर ठेवलेली लॅपटॉप बॅग चोरून नेली. या बॅगमध्ये लिनोओ कंपनीचा लॅपटॉप,हार्ड डिस्क,विवीध बँकाचे चेक बुक तसेच कंपनीचे महत्वाचे कागदपत्र आणि रोकड असा सुारे ४७ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.