इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवेसना ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर करुन नाशिक लोकसभा मतदार संघात सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषीत केली. त्यामुळे या जागेवर इच्छुक असलेले ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी आज प्रचंड संताप व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून ते लोकसभा मतदार संघात फिरत होते. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती. पण,अचानक वाजे यांचे नाव घोषीत झाल्यामुळे त्यांनी आज थेट पत्रकार पऱिषद घेत आपला संताप व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मी तयारी करत आहे. याबाबत मला शिवसेना नेत्यांनीच तयारी करण्याचे आदेश दिले होते. मी निवडणूक लढण्यासाठी २०१४ व २०१९ पासून इच्छुक होतो. दोन्ही वेळेस मला थांबविण्यात आले. प्रत्येक वेळी पक्षाशी प्रामाणिक राहिलो व पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. मला जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, महापालिका, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकीचा अनुभव आहे. अनेकवेळा लोकसभा निवडणुकीसंदर्भात जो सर्व्हे झाला त्यात माझे नाव नेहमीच अग्रेसर होते. जे इच्छुक नव्हते. त्यांना उमेदवारी घोषीत केली. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारे अन्याय सहन करणार नाही. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी अजून भरपूर वेळ आहे. जो निर्णय घेईल तो जिंकण्यासाठीच घेईल असा विश्वास करंजकर यांनी व्यक्त केला.
तसेच माझे तिकीट कापण्यामागे कोणाचा हात आहे हे सुद्दा मी तपासून पाहणार आहे. मी आतापर्यंत कोणावरही अन्याय केला नाही. माझ्यावर जो अन्याय झाला तो माझे समर्थक सहन करणार नाही. येत्या दोन दिवसात मी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करेल. त्यानंतर निर्णय घेईल. मात्र आपण निवडणूक लढणार विरोधकांना पाडणार असा ठाम विश्वास करंजकर यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार योगश घोलप, संजय तुंगार, चंद्रकांत गोडसे, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.