नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तपोवनातील कपीला संगम भागात दोघा मित्रांना धमकावित ट्रिपलसीट दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन पराग दिक्षीत (रा.अमृतधाम पंचवटी) या अल्पवयीन मुलाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दिक्षीत व त्याचा मित्र गेल्या २९ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी तपोवनात गेले असता ही घटना घडली. दोघे मित्र कपीला संगम भागात बसलेले असतांना दुचाकीवर ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांना गाठले.
यावेळी त्रिकुटाने तुमच्या मुळे अपघात झाला असून, ते लोक तुम्हाला मारण्यासाठी येत असल्याचे सांगून दोघा मित्रांना बोलण्यात गुंतविले. याचवेळी दुचाकीसुरू करून भामट्यांनी दिक्षीत याच्या हातातील सुमारे २६ हजार रूपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक दाईगडे करीत आहेत.