इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगलीः महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाने आपल्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात सांगली लोकसभा मतदारसंघाचे सुध्दा नाव आहे. महाविकास आघाडीमध्ये या जागेबाबत अजूनही तिढा सुटलेला नसतांना ही उमेदवारी जाहीर केल्यामुळे येथील काँग्रेस नेते नाराज आहे. त्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेला देण्यास काँग्रेसचा विरोध कायम असून मतदारसंघ काँग्रेसकडेच ठेवावा, या मागणीसाठी काँग्रेसचे नेते दिल्लीला जाऊन काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे या ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची तयारी कित्येक दिवसांपासून करीत आहेत. असे असताना हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यामुळे काँग्रसचे नेते आज दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सध्या महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगले आहे. उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आज यादी जाहीर केली. सांगलीची जागा कॉंग्रेसकडेच राहावी, यासाठी आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील हे सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत.