इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच खिचडी घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना समन्स बजावले.
ठाकरे गटाने कीर्तिकर यांना मुंबई-उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. स्थलांतरित मजुरांना खिचडी पुरवण्याचे कंत्राट देताना फसवणूक झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या फिर्यादीत म्हटले आहे, की मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा कार्यालयात नऊ एप्रिल २०२० रोजी झालेल्या बैठकीत खिचडीबाबत काही निकष ठरवण्यात आले होते. या निकषांची पूर्तता न करता वैष्णवी किचन/सह्याद्री रिफ्रेशमेंट आणि सुनील उर्फ बाळा कदम यांना कंत्राट देण्यात आले. त्यांनी इतरांना उपकंत्राट दिली.निकषापेक्षा कमी वजनाची अन्न पार्सल दिली. सुनील उर्फ बाळा कदम, राजू साळुंखे, खा. संजय राऊत यांच्या सुजीत पाटकर या सहकाऱ्यासह सहकारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सह्याद्री रिफ्रेशमेंट्सला महापालिकेकडून पाच कोटी ९३ लाख रुपये मिळाले. त्यापैकी काही रक्कम पाटकर यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली. इतर संस्थांना देण्यात आलेल्या कंत्राटांमध्ये अनियमितता आढळली.