इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावः भाजपमध्ये रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर आता भाजपमधील अंतर्गत कलह समोर येऊ लागला आहे. भाजप उमेदवार रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या समक्ष खडाजंगी झाल्यानंतर हा विषय सध्या चर्चेचा ठरला आहे. विशेष म्हणजे हा वादाचा हा व्हिडिओ ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाल्यामुळे भाजपमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
या व्हिडिओमध्ये बैठकीला आमदार, पदाधिकारी तसेच जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ उपस्थित होत्या. यात एकनाथ खडसे यांचे नाव घेता; मात्र महाजन यांचे नाव का घेत नाही? असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खा. खडसे यांना विचारला. खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरतात. त्यांच्या गाडीत तुतारीचे लोक असतात, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. महाजन यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
व्हिडिओत कार्यकर्ते म्हणतात, ‘की आम्ही भाजपलाच मतदान करू. कमळ १०१ टक्के निवडून येणार आहे; पण कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. खडसे भाजप कार्यकर्त्यांऐवजी सुधाकर जावळे यांना घेऊन फिरतात. शपथ घेऊन सांगा गाडीत भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीचे ? असा आरोपांचा भडीमार कार्यकर्त्यांनी खडसे यांच्यावर केला. कार्यकर्ते रक्षा खडसे यांच्यात वाद सुरू असतांना महाजन कार्यकर्त्यांना शांत करीत होते. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे भाजपतील अंतर्गत कलह तसेच खडसे यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी उघड झाली आहे.