इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या गांधी चौकातील विजय संकल्प सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खा.रामदास तडस, आ.संदीप धुर्वे, आ.अशोक उईके, आशिष देशमुख तसेच भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेला श्री. फडणवीस,श्री बावनकुळे व श्री. मुनगंटीवार यांनी संबोधित केले. सभेनंतर गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणुकीने जात श्री. मुनगंटीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आ.संजीव रेड्डी आदी उपस्थित होते. या मिरवणुकीत महायुतीचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार, विद्यमान खासदार अशोक नेते यांनीही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला . त्याआधी झालेल्या विजय संकल्प सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी चे नेते, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम ,आ. देवराव होळी, आ. बंटी भांगडिया, आ.कृष्णा गजबे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष व महायुतीच्या घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. अर्ज भरण्यापूर्वी खा.नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती.









