इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने न राज्यात ४८ जागांपैकी कोणी कोणती निवडणूक लढवणार आहोत, याबाबत ९९ टक्के काम झाले आहे. परवा मुंबईत सर्व जागांचे उमेदवार घोषित होतील. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनील तटकरे हे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, संजय बनसोडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की,शिवाजीराव आढळराव पाटील २० वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून शिवसेनेत गेले होते, आज ते पुन्हा स्वगृही आले. त्यांना शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यास तिकीट देण्यात येईल, भाजपने गेल्या निवडणुकीत २३ तर शिवसेनेने १८ जागी विजय मिळवला होता. त्यामुळे या सर्वांचा विचार करुन जागा वाटप निश्चित केले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा दाखवून चुकीचा प्रचार केला जात आहे. भाजप आणि शिवसेनेने जिंकलेल्या जागांची मागणी केली. आम्हला ज्या जागा पाहिजे होत्या, त्याबाबत भूमिका घेतली आणि त्याला इतर दोन पक्षांनी सहकार्य केले आहे. आमचा उमेदवार मतदारसंघात नसला, तरी इतर मित्र पक्षासोबत प्रचार यंत्रणा राबवण्याचे निर्देश दिले आहेत. आमच्या पक्षाचे निवडणूक प्रमुख म्हणून धनंजय मुंडे यांना जबाबदारी दिली असल्याची माहिती पवार यांनी दिली.
बारामतीबाबत आम्ही सस्पेन्स ठेवत आहोत. योग्यवेळी तुमच्या मनात जे नाव आहे, तेच जाहीर होईल, असे सांगून ते म्हणाले, की आम्ही खूप जागा मागितल्या; पण समाधानकारक जागा घेतल्या आहे. पक्षातील अनेकांची वेगवेगळी असतात; परंतु संबधित पक्षाचे प्रमुख उमेदवारी बाबत निर्णय घेत असतात.