इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई: वंचित बहुजन आघाडीला आता चारऐवजी पाच जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिला आहे. पूर्वी चार जागांचा प्रस्ताव दिला होता, पण, वंचितने तो फेटाळला होता. पण, आता एक जागा जास्त देण्याची तयारी महाविकास आघाडीने दाखवली आहे. तर दुसरीकडे वंचितने सहा जागांचा प्रस्ताव दिल्याचे बोलले जात आहे.
वंचितला शिवसेनेच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून दोन आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा सोडण्यात येणार आहे. महाविकास आघाडी आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात आज चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकर आपली भूमिका उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे अगोदरच जाहीर केले आहे. ते महाविकास आघाडीच्या साथीने लढणार की तिसऱ्या आघाडीचा पर्याय स्वीकारणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेची यादी आता उद्या जाहीर होणार
शिवसेना ठाकरे गटाची यादी ही वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर उद्या जाहीर होणार आहे. भिवंडी, सांगली आणि जालना यासारख्या जागांचा प्रश्न सुटला आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला, जालन्याची जागा काँग्रेस तर सांगलीची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला दिली आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने न लढल्यास शिवसेना ठाकरे गट वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
.