नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -रस्त्याने पायी जाणा-या शिक्षीकेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना नाशिक पुणा मार्गावरील आंबेडकरनगर भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेखा आकाश ननावरे (रा.नाशिक पुणा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. ननावरे या शिक्षीका असून त्या शनिवारी (दि.२३) रात्री घरपरिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. आंबेडकर नगर परिसरातील कॉलनीरोडने त्या पायी जात असतांना मोपेड दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ३५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या व्यक्तीच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण सखाराम लांभाडे (रा.महादेव मंदिराजवळ,संजीवनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लांभांडे गेल्या ३ मार्च रोजी रात्री परिसरातील कारगील चौकातून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली होती. मोबाईलवर बोलत ते पायी जात असतांना कृष्णा स्विटसमोर पाठीमागून दुचाकीवर ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या हातातील सुमारे आठ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.