इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत न आल्यास शिवसेना ठाकरे गट २२, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १० जागा लढणार आहे. भिवंडी, सांगली, दक्षिण मध्य आणि जालन्याच्या जागेचा तिढा सुटला आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, जालन्याची जागा काँग्रेस, सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राजू शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी न झाल्यास शिवसेना ठाकरे गट वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, ‘वंचित’च्या अल्टिमेटमची दखल न घेतल्याने प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. माझ्या आजोबांची म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी लाचारीविरोधात चळवळ चालवली होती; परंतु येथे चळवळीच लाचार केल्या जातात. लाचारी आम्ही कधीही मान्य करणार नाही, असा असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्याने आता उमेदवारी घोषित करण्याचा मार्गही खुला झाला आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि पवार गटाचे बहुतांश उमेदवार ठरले आहेत. त्यामुळे उद्या या उमेदवारांची घोषणा होऊ शकते.