इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – भारतीय शास्त्रज्ञांनी आजपर्यंत केलेल्या कित्येक आविष्कारांचे जगभरातून कौतुकच झाले आहे. अगदी चांद्रयान आणि आदित्य एलपर्यंत प्रत्येक मोहीमेचे जगाने कौतुक केले आहे. विशेष म्हणजे विज्ञानात अफलातून प्रगती करणाऱ्या अमेरिकेनेही मनापासून कौतुक केले आहे. पण आता अमेरिकेने भारतीय शास्त्रांना अर्थात इस्रोला दिलेली ऑफर आश्चर्याचा धक्का देणारी आहे.
अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी इस्रोला दिलेली ऑफर ही चांद्रयान-३ बद्दलची आहे. या अभियानाचे अंतराळातील यश बघितल्यानंतर अमेरिकेने हा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती खुद्द इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनीच दिली. ‘आपला देश खुप शक्तीशाली आहे. आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा जगभरात कमालीचा आदर आहे. चांद्रयान-३ मध्ये जेव्हा आम्ही अंतराळ यानाची रचना केली, त्याचा विकास केला. तेव्हा आम्ही नासा-जेपीएलच्या तज्ज्ञांना आमंत्रित केले होते. तेथील जवळपास पाच ते सहा तज्ज्ञांनी इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली होती. आम्ही त्यांना चांद्रयान-३ बद्दलची माहिती दिली. त्याचे सॉफ्ट लँडिंग होण्यापूर्वी केलेल्या तयारीची माहिती दिली. त्यावेळी अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ चे तंत्रज्ञान विकण्याचा विचार आहे का, अशी ऑफर दिली होती,’ असे सोमनाथ यांनी सांगितले. तुमची वैज्ञानिक उपकरणे खूप स्वस्त आहेत. तुम्ही वापरलेले तंत्रज्ञान उच्च पातळीचे आणि उत्तम दर्जाचे आहे. तुम्ही ते कसे तयार केले? तुम्ही हे तंत्रज्ञान अमेरिकेला का विकत नाही?, अशी ऑफर अमेरिकेने इस्रोला दिली होती, असे सोमनाथ म्हणाले.
भारत सर्वोत्तम रॅकेट तयार करण्यासाठी सक्षम
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एस. सोमनाथ विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले, ‘आज देश खूप मोठ्या प्रमाणात बदलला आहे. आपण सर्वोत्तम रॅकेट, उपकरणे तयार करण्यासाठी सक्षम आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे.’