नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील हॉस्पिटलमध्ये काऊन्सरचे काम करणा-या महिलेस चार लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन फ्रॉडची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी ही फसवणूक केली आहे. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयंक बांधवारा (रा.गुडगाव,हरियाणा) असे गंडा घालणा-या संशयिताचे नाव आहे.
याबाबत क्रांती पुरंदरे (रा.भाभानगर) यांनी फिर्याद दिली आहे. पुरंदरे या काऊन्सलर असून त्या विविध हॉस्पिटलमध्ये सेवा देतात. जुलै २०२३ मध्ये भामट्याने त्यांच्याशी संपर्क साधला होता. या काळात पुरंदरे यांच्या सोबत ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडला होता. यात मोठ्या रकमेची फसवणुक झाली होती. भामट्याने त्यांच्याशी संपर्क साधत फसवणुक झालेली रक्कम पुन्हा मिळवून देण्याचे आमिष दाखविल्याने पुरंदरे यांचा विश्वास बसला.
यानंतर भामट्याने प्रोसेसींग फी म्हणून ३ लाख ९१ हजार ५० रूपयांची रक्कम वेळोवेळी ऑनलाईन स्विकारली. अनेक महिने उलटूनही फ्रॉडची रक्कम पदरात न पडल्याने पुरंदरे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.