इंडिया दर्पण ऑलाईन डेस्क
व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. घर बांधणीसाठी पैसे मिळावेत, म्हणून त्याच परिसरात राहणाऱ्या एकाने हे कृत्य केले आहे. त्याने २३ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी मुलाची हत्या करून घराच्या मागे पुरले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी सलमानला अटक केली आहे.
गोरेगाव, बदलापूर येथे संध्याकाळची नमाज अदा केल्यानंतर नऊ वर्षीय इबाद मशिदीतून बाहेर पडत असताना त्याचे अपहरण करण्यात आले. इबाद घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू घेतला. मुलाचे वडील मुद्दसिर यांना सलमानाने फोन करून, मुलगा जिवंत हवा असेल तर २३ लाख रुपयांची मागणी केली.
मुलाच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सलमान मौलवी नावाच्या तरुणाच्या घराची झडती घेतली. त्याच्या घराच्या मागे मुलाचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी सलमान, सुफियानसह पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.