इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. कुरुक्षेत्रातील काँग्रेसचे माजी खासदार आणि देशातील सर्वात मोठे उद्योगपती नवीन जिंदाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर एक तासातच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी जिंदाल ग्रुप आणि सावित्री जिंदाल यांनी वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अटकळ जोर धरू लागली होती. जिंदाल फॅमिली ट्रस्ट हिसारमधील महाराज अग्रसेन मेडिकल इन्स्टिट्यूटची देखरेख करते. या संस्थेने ‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या अहवालानुसार अलीकडेच उत्तर भारतातील सर्वोच्च मान मिळवला आहे.
जिंदाल ग्रुप आणि जिंदाल कुटुंबाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल आणि आरोग्य मंत्री अनिल वीज यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. या घडामोडींनंतर नवीन जिंदाल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नवीन जिंदाल यांचे काँग्रेस नेत्यांशी मतभेद असल्याचेही अलीकडील अहवालातून स्पष्ट झाले आहे. नवीन जिंदाल यांनी नुकतीच भाजप पक्षश्रेष्ठीची भेट घेतली होती. त्या बैठकीत त्यांच्या भाजप प्रवेशाची स्क्रिप्ट लिहिली गेली. त्यानंतर आज प्रवेश व उमेदवारीही देण्यात आली.