इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विदर्भात काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. रामटेक लोकसभा मतदार संघातून ते शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी करणार आहे.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते म्हणाले, आपल्या विभागाचा विकास झाला पाहिजे. रामटेक मतदारसंघाचा विकास कसा होईल, यासाठी माझं काम असलं पाहिजे. मी सात महिने बाकी असताना माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून काम करण्याची माझी इच्छा आहे. मी सर्व नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. रामटेकबद्दल कमिटमेंट झालं आहे. रामटेकची लोकसभेची जागा मी लढणार असल्याचे ते म्हणाले..
शिवसेना शिंदे गटाने दिली ही माहिती
नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते. यासमयी आमदार राजू पारवे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव हेदेखील उपस्थित होते.