मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. दिनांक 17 ते 22 मार्च 2024 या कालावधीत राज्यात 1 लाख 84 हजार 841 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजि पत्रकार परिषदेत एस. चोक्कलिंगम् बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19.04.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20.03.2024 पासून सुरु झाली आहे, नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 27.03.2024 असा आहे, नामनिर्देशनपत्राची छाननी दि.28.03.2024 रोजी आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दि.30.03.2024 असा आहे. त्या दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित होईल.