इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४६ उमेदरावाराची चौथी उमेदवारी जाहीर केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीमधून सलग तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
अजय राय यांनी २०१४ आणि २०१९ या दोन निवडणुका मोदी यांच्याविरोधात लढल्या; परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांचा चार लाख ऐंशी हजार मतांनी पराभव केला होता, तर राय यांना एक लाख ५२ हजार ५४८ मते मिळाली होती. ते तिसऱ्या स्थानी होते. गेल्या निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातून मोदी यांना ६३.६२ टक्के मते मिळाली होती, तर राय यांना १४.३८ टक्के मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसने राय यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.
काँग्रेसने लोकसभेच्या ५४३ जागांपैकी आत्तापर्यंत १८५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीत काँग्रेसने अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना राजगढमधून, अरुण श्रीवास्तव यांना भोपाळमधून, तर नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूरमधून आ. विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.