इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये सैनिकांसोबत होळी हा रंगांचा सण साजरा केला. त्यावेळी संरक्षण मंत्र्यांसोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि जनरल ऑफिसर कमांडिंग, फायर अँड फ्युरी कॉर्प्स लेफ्टनंट जनरल रशीम बाली उपस्थित होते.
यावेळी सैनिकांना संबोधित करताना, संरक्षण मंत्री यांनी मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी खडतर भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानात सेवा देत असल्याबद्दल सैनिकांच्या शौर्याची, दृढनिश्चयाची आणि त्यागाची प्रशंसा केली. अति उंच प्रदेशात तैनात असलेल्या सैनिकांची सकारात्मक बांधिलकी ही उणे तापमानापेक्षा अधिक मजबूत आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले. ज्याप्रमाणे दिल्ली ही राष्ट्रीय राजधानी आहे, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि बेंगळुरू ही तंत्रज्ञानाची राजधानी आहे, त्याचप्रमाणे लडाखची भूमी ही भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची राजधानी आहे असे संरक्षण मंत्री म्हणाले.
आपले शूर सैनिक सीमेचे रक्षण करत असल्याने संपूर्ण देशाला सुरक्षित वाटत आहे. आमचे दक्ष सैनिक सीमेवर सज्ज असल्याने आम्ही प्रगती करत आहोत आणि आनंदी जीवन जगत आहोत. देशातल्या प्रत्येक नागरिकाला सशस्त्र दलांबद्दल अभिमान वाटतो, कारण आपले जवान आपल्या कुटुंबापासून दूर राहतात आणि त्यांच्यामुळेच आपण होळी आणि इतर सण आपल्या कुटुंबियांसोबत शांततेने साजरे करू शकतो. हा देश आपल्या सैनिकांप्रती सदैव ऋणी राहील आणि त्यांचे धैर्य व त्याग भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
यावेळी संरक्षण मंत्री यांनी प्रतिपादन केले की, आपण एक दिवस आधी सैनिकांसोबत होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला, कारण माझा असा विश्वास आहे की हे सण आधी देशाच्या संरक्षकांनी साजरे केले पाहिजेत आणि देशाच्या संरक्षकांसोबत साजरे झाले पाहिजेत. एक दिवस आधी सैनिकांसोबत सण साजरे करण्याची नवी परंपरा प्रस्थापित करावी, असे आवाहन त्यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांना केले. ते म्हणाले, “कारगिलच्या बर्फाळ शिखरांवर, राजस्थानच्या तप्त मैदानावर आणि खोल समुद्रात पाणबुड्यांमध्ये असलेल्या सैनिकांसोबत असे उत्सव साजरे करणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. याप्रसंगी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेह येथील युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली.