इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार व विजय शिवतारे यांचा वाद शमण्याची चिन्ह नाही. आता शिवतारे यांनी बारामतीतून १२ एप्रिलला १२ वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणाच करुन टाकली. त्यामुळे आता बारामती सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार व विजय शिवतारे यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रविवारी कार्यकत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी अजित पवार व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांचा विंचु म्हणून उल्लेख केला. ते म्हणाले की, १ एप्रिल रोजी सभा घेणार आहे. या सभेला ५० ते ६० हजार लोकांची उपस्थितीत असणार आहे. त्यानंतर सगळ्या विधानसभा मतदार संघात सभा घेणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन बैठका घेऊन सुध्दा शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आज त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, लोकसभा लढवणार म्हणजे लढवणार, मी बारामतीमधून निवडणूक लढवावी अशी लोकभावना आहे.
याअगोदरही शिवतारे यांनी अजित पवार यांनी मला उद्देशून शिवतारे तुझा आवाका किती? तू करतोय काय? तुला बघतोच असा इशारा दिला होता. आता अजित पवारांना माझा आवाका किती, मी किती लहान आहे, माझी लायकी काय हे सर्व दाखवून द्याचचे आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये अजित पवारांना विरोध करणारा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वच लोकांना माझ्या उमेदवारीची उत्सुकता आहे, असेही शिवतारे यांनी सांगितले होते.
शिवतारे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार यांची चांगलीच अडचण झाली आहे. एकीकडे पवार विरुध्द पवार अशी लढत असतांना त्यांना स्वकीयांकडूनच विरोध होत असतांना आता महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचा उमेदवार त्यांच्या विरुध्द दंड थोपटून उभा असल्यामुळे त्याचे पडसादही या निवडणुकीत पडणार आहे.