नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या चार जनावरांची पोलीसांनी सुटका केली. त्यात दोन गाई व दोन वासरांचा समावेश आहे. ही कारवाई कथडा भागात करण्यात आली असून याप्रकरणी गोठा मालकाविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलीम सलीम शेख (३२ रा.घर नं.३७५१ कथडा जुने नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित गोठामालकाचे नाव आहे. शहरात गोवंश हत्या विषयी कठोर कारवाई सुरू असून थेट तडिपारीची कारवाई केली जात असतांनाही गोवंश जनावरांची कत्तल केली जात आहे. यापार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीसांचे गुन्हे शोध पथक कामाला लागलेले असतांना शनिवारी (दि.२३) सकाळी पथकास खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने खात्री केली असता कथडा सर्व्हीस स्टेशन जवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये दोन गायी व दोन वासरू डांबून ठेवल्याचे आढळून आले.
पोलीसांनी केलेल्या संशयिताच्या तपासात कत्तलीसाठी ही जनावरे डांबून ठेवल्याचे पुढे आल्याने पोलीसांनी पालन पोषणासाठी जनावरांची रवानगी तपोवनातील पांजरपोळ येथे केली आहे. याप्रकरणी संशयिताविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमसह प्राण्यांना क्रुरतेने विगविण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार सतिश साळुंके करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील व संतोष नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार,जमादार यशवंत गांगुर्डे, हवालदार सतिष साळुंखे,पोलीस नाईक कय्युम सय्यद,अविनाश जुंद्रे शिपाई नितीन भामरे,निलेश विखे व दयानंत सोनवणे आदींच्या पथकाने केली.