नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालुक्यातील पळसे येथे पिस्तूल बाळगणा-या एकास पोलीसांनी गजाआड केले. या संशयिताच्या ताब्यातून देशी बनावटीच्या पिस्टलसह तीन जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली.
योगेश प्रल्हाद आहेर (३९ रा.मगर मळा,रेल्वे ट्रक्शन जवळ एकलहरारोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पिस्तूलधारीचे नाव आहे. याबाबत पथकाचे अंमलदार भगवान जाधव व पोलीस नाईक दत्ता चकोर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. योगेश आहेर याच्याकडे पिस्तूल असून तो शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी पळसे गावातील आशिर्वाद बिल्डींग भागात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने सापळा लावला असता रस्त्याने पायी येणारा संशयित पोलीसांच्या हाती लागला.
संशयिताच्या अंगझडतीत पिस्तूलसह तीन जीवंत काडतुसे असा सुमारे ४३ हजार रूपये किमतीचा ऐवज आढळून आला असून संशयितासह मुद्देमाल पथकाने नाशिकरोड पोलीसांच्या स्वाधिन केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत नागरे,उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड,दिलीप सगळे,जमादार रंजन बेंडाळे,हवालदार किशोर रोकडे,गणेश भामरे,डंबाळे,पोलीस नाईक योगेश चव्हाण,भुषण सोनवणे,रविंद्र दिघे, दत्ता चकोर,अंमलदार अनिरूध्द येवले,बाळा नांद्रे,चंद्रकांत बागडे,चारूदत्त निकम,राऊत,विठ्ठल चव्हाण आदींच्या पथकाने केली.