इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावःबारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे काम करायला तयार नसल्याने रावेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आता भाजपचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. रावेरचे नाक दाबले, की बारामतीचे तोंड उघडेल, असा पवित्रा अजित पवार गटाने घेतला आहे.
शिंदेसेनेचे विजय शिवतारे आणि भाजपचे इंदापूर येथील नेते हर्षवर्धन पाटील बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवारांच्या बाबतीत काय भूमिका घेणार, यावरच भाजपला मदत करावी किंवा नाही हे ठरणार आहे. जोपर्यंत बारामतीबाबत त्या दोघांची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे याचा प्रचार न करण्याचा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिला आहे. भाजपने शिवतारे, हर्षवर्धन पाटील यांना रोखावे, तरच भाजपचा प्रचार करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
भुसावळमधील पक्ष मेळाव्यातील इशारा राजकीय धोणाचा भाग असल्याचा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला. शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे महायुतीत तणाव असून त्याचे पडसाद राज्यातील अजित पवार गटाच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात उमटले आहेत. वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत कुणीही भाजपचा प्रचार करू नये, अशी भूमिका घेण्यात आली.