इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली. पाटील यांच्यावर सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर ते रविवारी रात्री सोलापुरात आले होते. या ठिकाणी शासकीय विश्रामगृहात त्यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. ही शाई फेकल्यानंतर या ठिकाणी सर्वांचाच गोंधळ उडाला.
या शाईफेक प्रकरणात पोलिसांनी भीमा आर्मीच्या अजय मैंदर्गीकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालकमंत्री येणार असल्यामुळे मोठा बंदोबस्त होता. पोलिस आयुक्त डॅा. राजेंद्र माने यांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली होती. असे असतांना त्यांच्यावर शाईफेक झाली. याअगोदरही चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक झाली होती. त्यावेळेस राजकीय वातावरणही चांगलेच तापले होते. आंदोलनही करण्यात आले होते. त्याच्याबाबत ही दुस-यांदा घटना घडली आहे.
याअगोदर याच शासकीय विश्रामगृहात तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळण्यात आला होता. धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक शेखर बंगाळे याने धनगर आरक्षण प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी ही कृती केली होती. आज विषय दुसरा होता. पण, टार्गेट पालकमंत्रीच होते.