इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः रणदीप हुड्डा याची मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राहूल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची तिकिटे पाठवून डिवचण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कायम टीका करण्यात येते त्यामुळे हे तिकीट पाठवून डिवचण्यात आले आहे.
भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजंदर सिंग तिवाना यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाची तीन तिकिटे काढून राहुल, सोनिया आणि प्रियंका गांधी यांना पाठवली आहेत. सोबत पॉपकॉर्न आणि कोल्डड्रिंक्सचे कुपन पाठवून तुमच्या पक्षाची सर्व खाती गोठवल्याने तुमच्याकडे पॉपकॉर्न आणि कोल्ड ड्रिंक्सचेही पैसे नसतील, असे म्हणत त्यांना डिवचण्यात आले आहे.
तिवाना म्हणाले, की राहुल गांधीजी जय श्रीराम! मी तुम्हा तिघांना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे तीन तिकीट पाठवत आहे. तुम्ही कायमस्वरूपी विरोधी पक्षाचे नेते आहात. त्यामुळे तुम्हाला देशाच्या इतिहासाची माहिती असणे आवश्यक आहे. हा चित्रपट पाहून आपल्या परिवाराचे डोळे उघडतील.