इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे, अशी घोषणा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून ते म्हणाले, की महाविकास आघाडीने सहकार्य केले असते, तर जागा वाटपाचा तिला सुटला असता. महाविकास आघाडीच्या जागा वाटप हा त्यांचा प्रश्न आहे, मला विचारून उपयोग नाही. हा प्रश्न त्यांनाच विचारा. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. ते एकमेकांसोबतच भांडत आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने अंतिम निर्णय आमच्यापर्यंत आला नाही, असे त्यांनी सांगितले.
जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही अजूनही तयार आहोत; मात्र महाविकास आघाडीत अंतर्गत कलह सुरू असल्याचा दावा करन ॲड. आंबेडकर म्हणाले, की आम्ही २६ तारखेपर्यंत थांबणार आहोत. त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. काँग्रेसच्या सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्रात काँग्रेस सोबत सात जागांबाबत एकमत झाले, तर चांगलेच आहे. ते होत असेल तर खर्गे यांनी तसे कळवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.